header

देशातील संग्रहालये डिजिटल स्वरूपात

 
C-DAC Logo
 
महाराष्ट्र टाइम्स
मार्च 20, 2022

देशातील संग्रहालये डिजिटल स्वरूपात

दिल्लीचे राष्ट्रीय संग्रहालय, हैदराबादचे सालारजंग संग्रहालय, कोलकात्याचा व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल अशी देशातील विविध महत्त्वपूर्ण संग्रहालये आता डिजिटल स्वरूपात सर्वांपुढे येणार आहेत. पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग (सी-डॅक) तर्फे यासाठी ‘जतन’ हे विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या संग्रहालयांच्या डिजिटायझेशनबरोबरच लवकरच रसिकांना संग्रहालयाची व्हर्च्युअल टूर करणेही शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व संग्रहालयांचे डिजिटायझेशन करण्याचे काम ‘सी-डॅक’ कडे सोपविण्यात आले आहे. ‘सी-डॅक’च्या ह्युमन सेंटर्ड डिझाइन अँड कॉम्युटिंग ग्रुपने (एचसीडीसी) यासाठी ‘जतन’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या राज्यांमधील १0 राष्ट्रीय संग्रहालयांमध्ये डिजिटायझेशनची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पात सी-डॅकच्या तंत्रज्ञांच्या मदतीने संग्रहालयांमध्ये कम्प्युटर, स्कॅनर, स्टोरेज आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिलेले आहे. त्यानुसार या संग्रहालयातील कर्मचारीच यापुढे डिजिटाय��ेशनची प्रक्रिया पार पाडणार आहेत. या डिजिटायझेशनमुळे संग्रहालयांचा ‘राष्ट्रीय डाटाबेस’ तयार होणार आहे.

घरबसल्या व्हर्च्युअल टूर शक्य

‘संग्रहालयांची व्हर्च्युअल टूर हा या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी लागणारे व्हर्च्युअल गॅलरीचे सॉफ्टवेअर ‘सी-डॅक’ ने विकसित केले आहे. येत्या वर्षभरात या सर्व संग्रहालयाचे सेंट्रलाइज्ड पोर्टल सुरू झाल्यानंतर रसिकांना घरबसल्या संग्रहालयांची व्हर्च्युअल टूर करता येणार आहेत. त्याचबरोबर संग्रहालयातील तज्ज्ञ, इतिहास संशोधक यांच्याकडून या दुर्मिळ वस्तूंची माहिती जमा करून ती देण्यात येईल,’ असे सी-डॅकचे सहसंचालक आणि एचसीडीसी विभागप्रमुख डॉ. दिनेश कात्रे यांनी सांगितले.

प्रकल्पातील संग्रहालये

सालारजंग म्युझियम, हैदराबाद-आंध्र प्रदेश नॅशनल म्युझियम, नवी दिल्ली अलाहाबाद म्युझियम, अलाहाबाद-उत्तर प्रदेश इंडियन म्युझियम, कोलकता-पश्चिम बंगाल नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टस, नवी दिल्ली नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टस, मुंबई-महाराष्ट्र नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टस, बेंगळुरू -कर्नाटक आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्युझियम, गोवा आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्युझियम, नागार्जुनकोंडा-आंध्र प्रदेश व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, कोलकाता-पश्चिम बंगाल

जतन सॉफ्टवेअर हे भविष्यातील संग्रहालये निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे या संग्रहालयांची सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने, मोबाइवर, टचस्क्रीन किओस्कमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.

डॉ. हेमंत दरबारी, कार्यकारी संचालक, सी-डॅकच्या पुणे केंद्र