header

C-DAC: In the News

 
C-DAC Logo
 

संशोधन प्रकल्पात 'सीडॅक'चे पाऊल

Maharashtra Times
December 03, 2012

(Content in Marathi)

' सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग ' तर्फे (सीडॅक) सध्या ' एक्स-आय स्केल सुपर कम्प्युटर्स ' निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. त्यामध्ये ऊर्जा , जागा आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा निर्माण करण्यात येणा-या अडचणींवर मात करण्यासाठीचे संशोधन सध्या सीडॅकमध्ये सुरू आहे.

अशा प्रकारच्या सुपर कम्प्युटर्सच्या निर्मितीसाठी लागणारी प्रचंड जागा , हे सुपरकम्प्युटर्स चालविण्यासाठी वापरावी लागणारी वीज आणि या सुपर कम्प्युटर्समध्ये असणाऱ्या फ्रिक्वेन्सीवर काम करू शकणारी यंत्रणा तयार करणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ' आउट ऑफ बॉक्स ' विचार करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीतून यापुढच्या काळातील संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सीडॅकचे महासंचालक डॉ. रजत मूना यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

' हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग ' पेक्षा (एचपीसी) अधिक वेगवान कम्प्युटिंग सिस्टिम्स विकसित करण्यासाठी सीडॅकचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाशी चर्चाही सुरू आहे. त्याचप्रमाणे या यंत्रणांचा समाजाच्या हितासाठी अधिकाधिक वापर करण्यावर आमचा भर राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीडॅकने कॅन्सर विषयक संशोधन आणि उपचारांसाठी टाटा मेमोरियल सेंटरशी नुकताच एक करार केला आहे. आरोग्य सुविधांच्या क्षेत्रामध्येही एचपीसीच्या आधारे करता येणाऱ्या कामांच्या शक्यतांविषयी सध्या सीडॅककडून प्रकल्प ���ाबविण्यात येत आहेत.

हवामानशास्त्रासाठी उपयुक्त अशी निरनिराळी मॉडेल्स तयार करणे , त्यांची अचूकता , उपयुक्तता वाढविणे यासाठीही सीडॅकमध्ये संशोधन सुरू आहे. त्यातूनच देशातील ६८ हजार खेड्यांसाठी हवामानाची माहिती देऊ शकणारी यंत्रणा विकसित होणार असल्याचे डॉ. मूना यांनी स्पष्ट केले. जगभरातील साठ देशांमध्ये कम्प्युटरच्या क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी मदत पुरविण्याच्या दृष्टीने सीडॅकने पावले उचलल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ई-नोज तयार , प्रतिक्षा कंपन्यांची!

सीडॅकच्या अभिनव उत्पादनांविषयी माहिती देताना डॉ. मूना यांनी सीडॅकने तयार केलेल्या ई-नोजविषयी पत्रकारांना माहिती दिली. चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांची प्रतवारी करू शकणारे इलेक्ट्रॉनिक्स नोज अर्थात ई-नोज सीडॅकने विकसित केले आहे. त्यासाठीचे प्रोटोटाइप मॉडेल तयार झाले असून त्याच्या वापराविषयी सध्या इंडस्ट्रीशी चर्चा सुरू आहे. या उपकरणाच्या साहाय्याने अगदी कमी कालावधीत चहाच्या असंख्य नमुन्यांची प्रतवारी करणे शक्य असल्याचे डॉ. मूना यांनी स्पष्ट केले.