header

????????? ???? ??????????? ????

 
C-DAC Logo
 

केंद्राचे सुपर कम्प्युटिंग मिशन

Maharashtra Times
February 19, 2014

देशातील विविध क्षेत्रातील संशोधनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी 'नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन' राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत देशभर सुपर कम्प्युटरचे जाळे निर्माण करण्यात येईल. त्याचबरोबर अॅप्लिकेशन बेस्ड रिसर्च, हाय पॉवर कम्प्युटिंगमधील संशोधन आणि उपकरणांची निर्मिती; तसेच हाय पॉवर कम्प्युटिंगचा वापर करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

'नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन'ची आखणी करणाऱ्या समितीचे सदस्य आणि 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग'चे (सी-डॅक) वरिष्ठ संचालक डॉ. पी. के. सिन्हा यांनी ही माहिती 'मटा'ला दिली. दोन वर्षांपासून तयार करण्यात येत असलेले 'नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन'चा आराखडा तयार झाला असून, लवकरच त्याला केंद्र सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पाच ते सात वर्षांत हे मिशन पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असणार आहे.

'याअंतर्गत देशभर सुपर कम्प्युटरचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागात विविध क्षमतेचे सुपर कम्पुटर निर्माण करण्यात येतील. देशभरातील तीन ठिकाणी अतिउच्च क्षमतेचे सुपर कम्प्युटर, प्रादेशिक पातळीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) सारख्या ठिकाणी १५ ते २० ठिकाणी मध्यम क्षमतेचे सुपर कम्प्युटर, तर ४० ते ५० शैक्षणिक संस्थांमध्ये तुलनेने कमी क्षमता असलेले सुपर कम्प्युटर बसविण्यात येतील. या सर्व सुपर कम्प्युटरना 'नॅशनल नॉलेज नेट���र्क'च्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे,' असे डॉ. सिन्हा यांनी स्पष्ट केले.

'या सुपर कम्प्युटिंग सुविधांचा वापर हवामान, इंजिनीअरिंग, दळणवळण आदी विविध क्षेत्रातील संशोधनासाठी करता येईल. प्रत्येक क्षेत्रासाठी या सुविधांचा योग्य वापर करण्यासाठीची जबाबदारी त्या त्या विभागाच्या मंत्रालयावर सोपविण्यात येईल. त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन 'सी-डॅक', 'आयआयटी','एनआयटी'सारख्या संस्थांच्या माध्यमातून विविध संशोधन प्रकल्प राबवावेत, असा प्रस्ताव यात मांडण्यात आला आहे,'

भविष्यात सुपर कम्प्युटिंगची क्षमताही सातत्याने वाढवावी लागणार आहे. त्याबाबत डॉ. सिन्हा म्हणाले, 'भविष्याच्या दृष्टीने हार्डवेअर, सिस्टिम सॉफ्टवेअर, अॅप्लिकेशन्स, क्षमतेचा प्रभावी वापर यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भविष्यातील सुपर कम्प्युटिंग मशिन्ससाठीच्या संशोधनावरही यात भर देण्यात येणार आहे.'

'सुपर कम्प्युटिंगची सुविधा निर्माण केल्यानंतर त्याचा योग्य क्षमतेने वापरही होणे आवश्यक आहे. सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून विशिष्ट क्षेत्रासाठीची अॅप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी विशिष्ट क्षेत्रातील सखोल ज्ञानाबरोबरच सुपर कम्प्युटरचा योग्य वापर करू शकणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी असे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे,' असेही डॉ. सिन्हा यांनी स्पष्ट केले.

संशोधन, प्रगतीला चालना

भविष्यात कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी 'इनोव्हेशन' महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सुपर कम्प्युटिंगच्या माध्यमातून संशोधनाला वेगळेच परिमाण लाभणार आहे. पूर्वीच्या थिअरी आणि प्रॅक्टिकलच्या ऐवजी सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून सिम्युलेशन, डेटा अॅनॅलिसिसच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने संशोधन करता येईल. त्यामुळे संशोधन आणि देशाच्या प्रगतीलाही चालना मिळेल, असे डॉ. पी. के. सिन्हा यांनी सांगितले.