महाराष्ट्र टाइम्स
ऑगस्ट 23, 2016
प्रगत संगणन विकास केंद्राला (सी-डॅक) नव्या इमारतीच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने मंजूर केलेला निधी त्वरित द्यावा, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांना केली आहे. शिरोळे यांनी संबंधित मागणीचे पत्र शंकर यांना पाठविले असून येत्या काही दिवसात ते शंकर यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने सी-डॅकच्या पुणे केंद्राला पाषाणला नव्या आधुनिक संशोधन आणि विकास (आर अँड डी) इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन टप्प्यात निधी मंजूर केला. इमारतीच्या बांधकामाला येणाऱ्या एकूण ११६ कोटी २० लाख रुपये खर्चापैकी विभाग ६० टक्के तर सी-डॅक ४० टक्के निधी खर्च करणार आहे. त्यानुसार सी-डॅकने आतापर्यंत ४६ कोटी ४८ लाख रुपयांपैकी ३५ कोटी रुपये खर्च केले असून, उर्वरित पैसे बांधकामावर खर्च करण्यात येत आहेत. मात्र, विभागाने ६९ कोटी ७२ लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात २९ कोटी ८८ लाख रुपये दिले असून दुसऱ्या टप्प्यातील ३९ कोटी ८४ लाख रुपये देणे बाकी होते. त्यापैकी २ कोटी ५० लाख रुपये विभागाने काही दिवसांपूर्वी दिल्याने ३७ कोटी ३४ लाख रुपये येणे बाकी आहे.
सी-डॅकच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारचा मंजूर निधी मिळत नाही, स्वत:ची इमारत नसल्याने सी-डॅकचा कारभार भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. सुसज्ज इमारत नसल्याने स��कारच्या 'एनएसएस'ला होणारा विलंब, अशा सी-डॅकशी संबंधित वृत्तमालिका 'मटा'ने गेल्या आठवड्यात १४ ऑगस्ट, १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्टला प्रकाशित केली. त्यानुसार शिरोळे यांनी सी-डॅकच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने मंजूर केलेला उर्वरित निधी त्वरित द्यावा, अशी मागणी शंकर यांना पत्राद्वारे केली आहे.
केंद्र सरकारच्या मंजूर झालेल्या निधीमुळे सी-डॅकच्या नव्या आधुनिक संशोधन आणि विकास इमारतीचे पूर्ण होण्यास तसेच सी-डॅकला नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी मदत होणार होईल. त्यामुळे याबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन सी-डॅकला मंजूर निधी मिळवून देऊ.