काय सांगता करोना संसर्गावर गुळवेल, अश्वगंधा प्रभावी वाचा सविस्तर

 
C-DAC Logo
 
Maharashtra Times
March 31, 2022

रेमडेसिव्हिरसह अश्वगंधा आणि गुळवेल या वनस्पतींमधील रेणू करोना विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी सक्षम असल्याचे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंगने (सीडॅक) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

रेमडेसिव्हिरसह अश्वगंधा आणि गुळवेल या वनस्पतींमधील रेणू करोना विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी सक्षम असल्याचे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंगने (सीडॅक) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. सीडॅकने सिम्युलेशन तंत्राद्वारे जगभरातील ३५०० औषधांची सुपर कम्प्युटरद्वारे तपासणी केली असता एकूण १२ औषधे करोनावर प्रभावी असल्याचे आढळून आले.

'सीडॅक'च्या अभ्यासाचे निष्कर्ष 'रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री ॲडव्हान्सेस' या जर्नलसह जगभरातील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. 'सीडॅक'च्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हायपरफॉर्मन्स कम्प्युटिंग मेडिकल अँड बायो इन्फर्मेटिक्स ॲप्लिकेशन्स विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. राजेंद्र जोशी यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी 'सीडॅक'चे महासंचालक निवृत्त कर्नल ए. के. नाथ, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनचे संचालक डॉ. हेमंत दरबारी उपस्थित होते.

करोनावरील औषधांसाठी 'सीडॅक'तर्फे राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेविषयी डॉ. जोशी म्हणाले, 'कोव्हिडच्या पहिल्या लाटेदरम्यान करोना विषाणूवर कोणते औषध प्रभावी ठरेल हे तपासण्यासाठी 'सीडॅक'तर्फे सिम्युलेशन तंत्राचा वापर करण्यात आला. त्यासाठी अमेरिकेच्या 'एफडीए'ची स्वीकृती असलेल्या आणि ���ध्या वापरात असलेल्या जगभरातील सुमारे तीन हजार ५०० औषधांच्या रेणूंची तपासणी सुपर कम्प्युटरद्वारे करण्यात आली. श्वसनविकारांवर वापरण्यात येणाऱ्या या सर्व औषधांमधील रेणूंची त्रिमितीय रचना आणि करोना विषाणूच्या विविध व्हेरियंटची त्रिमितीय रचना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.'

'विषाणूला विविध ठिकाणी चिकटून (डॉकिंग) त्याचे कार्य थांबवू शकतील असे एफडीए स्वीकृती असलेल्या औषधांमधील आठ रेणू आम्हाला आढळले. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या गुळवेल, अश्वगंधासह चार वनस्पतींमधील रेणू करोना विषाणूला निष्क्रिय करीत असल्याचे सिम्युलेशनमध्ये दिसून आले. सुपर कम्प्युटरच्या साह्याने फक्त तीन आठवड्यांत ही तपासणी करण्यात आली. आमच्या सिम्युलेशन तपासणीनंतर पुढील काळात या औषधांच्या जगभरात क्लिनिकल चाचण्याही झाल्या ज्यांमध्ये ही औषधे करोनावर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले,' असेही डॉ. जोशी म्हणाले.

'एक्सास्केल सुपर कम्प्युटर पुढील दोन वर्षांत'

'नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनमुळे देशाची सुपर कम्प्युटिंग क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. देशभरातील शंभरपेक्षा अधिक संस्थांना सुपर कम्प्युटरची सुविधा मिळत असून संशोधन, हवामान अंदाजांसह सुरक्षाक्षेत्राला सुपर कम्प्युटिंगचा मोठा लाभ मिळत आहे. सध्याच्या पेटाफ्लॉप सुपर कम्प्युटरपेक्षा हजार पटींनी अधिक क्षमता असलेला एक्सास्केल सुपर कम्प्युटर पुढील दोन वर्षांत विकसित करण्याचे 'सीडॅक'चे लक्ष्य आहे,' अशी माहिती कर्नल नाथ यांनी दिली.

Top