Sakal Pune
March 31, 2022
देशातील संगणन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपयोगासाठी गरजेचे असलेले तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणार आहे. दोन एप्रिल २०२२ रोजी सी-डॅक आपला ३५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्रिनेत्र, टेट्रा आणि एम-कवच २, अशी तीन उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास अनेक प्रख्यात मान्यवर संबोधित करणार आहेत, अशी माहिती ‘सी-डॅक’चे महासंचालक कर्नल आशीत कुमार नाथ (निवृत्त) यांनी दिली. कॉर्पोरेट विभागाचे वरिष्ठ संचालक (आर अँड डी) डॉ. एन. सुब्रमण्यम, एनएसएमचे मिशन डायरेक्टर डॉ. हेमंत दरबारी, एचपीसी टेकचे संचालक आणि एचओडी संजय वांढेकर यावेळी उपस्थित होते. सायबर विश्वातील संभाव्य सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ‘सायबर मार्गदर्शक’ या हॅण्डबूकचे अनावरण यावेळी सी-डॅकच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
www.infosecawareness.in या संकेतस्थळावरून हे पुस्तक मोफत डाउनलोड करता येऊ शकते. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे बुक तयार केले आहे. त्रिनेत्र हे सुपर कॉम्प्युटरसाठी ६०० जीबीपीएस थ्रुपुटचे इंटरकनेक्ट आहे. हे त्रिनेत्र-ए या श्रृंखलेतील चौथ्या जनरेशनचे नेटवर्क आहे, तर टेट्रा हे अतिमहत्त्वपूर्ण संचारासाठी टेट्रा (टेरेस्ट्रीअल ट्रॅक्ड रेडिओ) तंत्रज्ञानावर आधारित असलेले एक बिनतारी संचार नेटवर्क आहे. एम-कवच २ हे नव्याने समोर येत असलेल्या सायबर धोक्यांना सक्षमरित्या हाताळण्यासाठी अँड्रॉइड आधारित मोबाईल सुरक्षा अॅप आहे.