??? ?????????????? '?-??????'!

 
C-DAC Logo
 

आता टीव्हीद्वारेही 'ई-लर्निग'!

Loksatta
April 11, 2013

(Content in Marathi)

आता टीव्ही बघता बघता शिक्षण घेणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर टीव्हीद्वारेच उत्तरांची देवाणघेवाण करून जे शिकलो ते कितपत समजले आहे, हे तपासताही येणार आहे! 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग'तर्फे (सी-डॅक) बुधवारी टीव्ही या माध्यमाद्वारे शिक्षण देणारे 'टी-लर्निग सूट' हे नवे उत्पादन सादर करण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त रक्ताच्या नमुन्यांचे स्वयंचलितपणे विश्लेषण करणारे 'एबीसी अ‍ॅनालायझर' हे उपकरण आणि इंटरनेट नेटवर्कच्या सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणारे 'ईडीजीई' हे नेटवर्क सोल्युशनही या वेळी संस्थेतर्फे सादर करण्यात आले. सी-डॅकचे महासंचालक प्रो. रजत मूना, संस्थेचे पुण्यातील कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी या वेळी उपस्थित होते. गुरुवारी संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या उत्पादनांचे औपचारिक अनावरण करण्यात येणार आहे.

'टी लर्निग सूट' या यंत्रणेत प्रेक्षकांना टीव्हीवर शैक्षणिक कार्यक्रम पाहता येतील. 'रीटर्न चॅनेल'ची सुविधा असणाऱ्या सेट टॉप बॉक्सद्वारे प्रेक्षक कार्यक्रमांवर आधारित प्रश्नांची उत्तरे रीमोटवरील बटण दाबून पाठवून स्वत:चे ज्ञान तपासून पाहू शकतील. सेट टॉप बॉक्सला रीटर्न चॅनेलची सोय नसली, तरीही प्रेक्षकांना कार्यक्रम डाऊनलोड करून त्यात सहभागी होता येईल. टी-लर्निग सूटमध्ये वापरता येतील असे शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्यासाठी सी-डॅक 'एज्युकेशनल मीडिया रीसर्च सेंटर' (इएमआरसी) या संस्थेची मदत घेणार आहे.

तर संस्थेचे 'एबीसी अ‍ॅनालायझर' हे रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी वापरले जाणारे स्वयंचलित उपकरण केवळ ४ ते ५ सेकंदांत रक्ताची चाचणी करू शकते. रक्ताच्या हिमोग्लोबिन, ट्रायग्लिसराइड्स, लिपिड प्रोफाइल अशा ८० टक्के चाचण्या या यंत्राद्वारे करणे शक्य होणार आहे. हे यंत्र वजनाला हलके असून आता बाजारात उपलब्ध असणाऱ्या चाचणी यंत्रांच्या तुलनेत ते एक तृतीयांश किमतीत उपलब्ध होऊ शकेल, असे मूना यांनी या वेळी सांगितले.

संस्थेचे 'ईडीजीई' (इंटरप्राइज वाइड सेल्फ मॅनेज्ड नेटवर्क सोल्युशन) हे अत्याधुनिक उत्पादन नेटवर्क सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी वापरता येणार आहे.

Top