???????????? ‘????? ?? ?????’

 
C-DAC Logo
 

स्मार्टफोनवर ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Times
February 05, 2014

स्मार्टफोनवरील अॅप्सच्या दुनियेची सुप्रीम कोर्टालाही भुरळ पडली असून, वकिलांना आणि त्यांच्या पक्षकारांना दैनंदिन कामकाजाची इत्थंभूत माहिती देण्यासाठी कोर्टाने नवे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या विनंतीवरून 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग'च्या (सी-डॅक) मुंबई विभागाने 'सुप्रीम कोर्ट केस' या अॅपची निर्मिती केली आहे.

गेल्याच आठवड्यात हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले असून, आतापर्यंत अनेकांनी ते डाउनलोड केल्याची माहिती 'सीडॅक'चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी कपिलकांत कमल यांनी 'मटा'ला दिली. 'सी-डॅक'ने यापूर्वी ऑगस्ट २०१३मध्ये फक्त वकिलांसाठीच हे अॅप विकसित केले होते. मात्र, त्यानंतर खास पक्षकारांनाच डोळ्यासमोर ठेवून नवीन आणि अपडेटेड अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

'अॅपच्या सुधारित आवृत्तीत सुप्रीम कोर्टात दैनंदिन कामकाजाची माहिती देणारा डिस्प्ले बोर्ड, खटल्याची सद्य परिस्थिती दर्शविणारे 'केस स्टेटस', दैनंदिन सुनावणी वेळापत्रक, कोणत्या कोर्टात सुनावणी आहे त्याची माहिती, कोर्ट क्रमांक, दैनंदिन निकाल आणि यापूर्वी कोर्टाने दिलेल्या निकालांची पीडीएफ स्वरूपात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ वकिलांसाठीच अॅपची निर्मिती केल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडूनच पक्षकारांनाही उपयुक्त ठरेल, अशा अॅपच्या निर्मितीची विनंती करण्यात आली. त्यानुसार नवे अॅप विकसित करण्यात आले आहे,' अशी माहिती कमल यांनी दिली.

सुप्रीम कोर्टातील कोणत्याही माहितीसाठी वकिलावर अवलंबून राहण्याची वेळ पक्षकारावर येणार नाही, अशी या अॅपची रचना करण्यात आली आहे. अॅपमध्ये डिस्प्ले बोर्ड, कॉज लिस्ट, केस स्टेटस, ऑफिस रिपोर्ट्स आणि डेली ऑर्डर्स असे पाच विभाग असून, पक्षकाराने केस नंबर टाकल्यानंतर त्याला हवी ती माहिती विनासायास उपलब्ध होते, असेही कमल यांनी स्पष्ट केले. सध्या हे अॅप केंद्र सरकारच्या अॅपस्टोअरवरच उपलब्ध असून, येत्या महिनाभरात अँड्रॉइड, विंडोज आणि आयफोन या ऑपरेटिंग सिस्टीमवर दाखल होणार आहे.

असे करा अॅप डाउनलोड

हे अॅप डाउनलोड करण्यासाठी केंद्र सरकारच्या कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग असणाऱ्या 'डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'च्या apps.mgov.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. साइटच्या होमपेजवर डावीकडे 'ज्युडिशियरी'मध्ये 'गव्हर्न्मेंट अॅप्लिकेशन' या विभागात हे अॅप उपलब्ध आहे. या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर 'एपीके' फाइल डाउनलोड होते.

Top