अभियांत्रिकीसाठी सी-डॅकचा लघू महासंगणक
Sakal
July 07, 2011
(Content in Marathi)
अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा लघू महासंगणक (मिनी सुपर कॉम्प्युटर) सी-डॅकने तयार केला आहे. पुणे व राज्यातील अनेक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांनी त्याचा वापर करण्याची उत्सुकता दर्शविली आहे. घाना, टांझानिया, अर्मेनिया, व्हिएतनाम, ग्रेनेडा आदी देशही त्याचा स्वीकार करीत आहेत.
परम युवा हा महासंगणक सी-डॅकने यापूर्वी तयार केला असून त्याला विविध देशांतून मागणी आहे. त्या संगणकात "ओनामा' या शिक्षणासाठीच्या ऍप्लिकेशनचा समावेश करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा वापर करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी हा लघू महासंगणक तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सी-डॅकमधील एचपीसी विभागातील प्रकल्प प्रमुख गोल्डी मिश्रा यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या महासंगणकामुळे विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञानाचे संगणन (हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग) हाताळण्याची संधी मिळणार आहे. एका महाविद्यालयात पाचशे किंवा त्याहून अधिक विद्यार्थी विविध संगणकांच्या माध्यमातून एकाच वेळी या महासंगणकावर काम करू शकतील. मेकॅनिकल, इलेट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, केमिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्सेस, न्यूक्लिअर इंजिनिअरिंग आदी विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी या संगणकाचा वापर होऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संगणकात अभियांत्रिकीच्या आधुनिक प्रवाहांचा वापर करता येणार आहे. दैनंदिन शिक्षणाबरोबरच विविध प्रकारचे प्रकल्प तयार करता येणार आहेत. त्यासाठी पूरक तंत्रज्ञान व माहितीचाही त्यात समावेश आहे. विविध अभ्यासक्रमही त्यातून पूर्ण करता येतील. संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या खासगी उद्योगसमूहांचीही माहिती त्यात असेल, असे मिश्रा यांनी नमूद केले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने याचा वापर सुरू केला असून विश्वकर्मा अभियांत्रिकी, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संस्थांशीही सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. नांदेडमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयानेही हा महासंगणक वापरण्यासाठी उत्सुकता दर्शविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील अभियांत्रिकी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हा लघू महासंगणक तयार करण्यात आला आहे. त्याची किंमतही माफक असून वापरासाठीचे प्रशिक्षण व आवश्यक तंत्रज्ञान सी-डॅककडून पुरविण्यात येते, असे मिश्रा यांनी सांगितले.
"एआयसीटीई'ची तत्त्वतः मान्यता
या महासंगणकाचा महाविद्यालयात वापर करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तत्त्वतः मान्यता दिली असून ओनामा ऍप्लिकेशनच्या आधुनिक आवृत्तीचे उद्घाटन संस्थेचे प्रभारी अध्यक्ष एस. एस. मंथा यांच्या हस्ते दिल्लीत नुकतेच झाले आहे. राज्यातील सर्व शासकीय अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांत याचा वापर सुरू करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडेही (डीटीई) या महासंगणकाचे सादरीकरण झाले आहे, असे मिश्रा यांनी नमूद केले.