C-DAC: Press Kit - In the News

 
C-DAC Logo
 

संगणक बोलणार भारतीय भाषा

सकाळ न्यूज
August 04, 2011

(Content in Marathi)

संगणकाच्या एका क्‍लिकवर जग जवळ येत असताना अंध व्यक्‍तींना त्यात काम करण्यासाठी मर्यादा येतात. यावर मात करीत "टेक्‍स्ट टू स्पीच सिंथेसिस सिस्टिम'ने सॉफ्टवेअर विकसित केल्यामुळे संगणकावर भारतीय भाषांमधून सूचना ऐकू येते, काम करणे अधिक सोपे व सोयीचे होते. चेन्नई आयआयएम आणि मुंबई "सी-डॅक' (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग) यांनी संयुक्तरीत्या मराठी, हिंदी, बंगाली, तेलगू, तमीळ, मल्याळम या भाषांमध्ये विकसित केलेले हे सॉफ्टवेअर या महिन्यात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

अंध व्यक्‍तींना संगणक हाताळता यावा यासाठी काही वर्षांपूर्वी जॉन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले होते. त्यामध्ये परदेशी उच्चार असलेल्या हिंदी भाषेमधून सूचना ऐकू येत होत्या. हे सॉफ्टवेअर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर होते. त्यावर उपाय शोधत 2009 मध्ये आयआयएम चेन्नई आणि मुंबई सी-डॅक यांनी संयुक्त प्रकल्प तयार केला. संगणकावरील सूचना भारतीय भाषांमध्ये ऐकू येतील अशा पद्धतीने विकसित केलेले सॉफ्टवेअर आता अंतिम टप्प्यात आहे. टीडीआयएल (टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅंग्वेज) या साईटवर ते विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे "सी-डॅक' मुंबईचे स्टाफ वैज्ञानिक प्रणवकुमार यांनी "सकाळ'ला सांगितले.

या सॉफ्टवेअरनुसार काम कसे करायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 30 अंध व्यक्‍तींची एक महिन्याची कार्यशाळा "सी-डॅक'ने नुकतीच घेतली. सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा, हे अंध असलेले हर्षद जाधव हेच शिकवत आहेत. ब्रेल लिपी आणि संगणकावर वापरण्यात येणारी युनिकोड या दोघांमध्येही खूप फरक आहे. त्यामुळे तो फरक आधी त्यांना समजून सांगितला. ब्रेलऐवजी युनिकोडमध्ये टाइप करताना सुरवातीला थोडे गोंधळल्यासारखे झाले; मात्र आता सगळे सोपे वाटत असल्याचे सीमा सांगते. तसेच एम.ए. झालेल्या अनिलला शिकवण्या घेताना, प्रश्‍नपत्रिका काढताना, प्रश्‍न टाइप करताना टायपिस्टची मदत घ्यावी लागत होती. आता या सॉफ्टवेअरमुळे त्याला कुणाचीही मदत घ्यावी लागत नाही.

या प्रोग्रॅमच्या मदतीने आता अंध व्यक्‍तींनाही संगणकावर काम करणे शक्‍य होऊ शकेल. त्यामुळे नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ शकतील. मराठीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रोग्रॅमसाठी अंजली कुलकर्णी यांचा आवाज देण्यात आला आहे.

सॉफ्टवेअरचा पुढचा टप्पा

सध्या ऐकू येत असलेल्या आवाजामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. लिहिलेला शब्द त्या- त्या भावनेनुसार कसा ऐकू येईल, यावर संशोधन सुरू आहे. तसेच गुजराती, ओरिया, बोडो, कन्नड, आसामी या भाषांमध्येही सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे

 

Top