दुबार नावे शोधता येणार एका क्लिकवर
Lokmat
August 04, 2011
(Content in Marathi)
मतदार याद्या, रेशनकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड यातील दुबार नावांमुळे शासकीय विश्वासार्हतेला लागलेले ‘ग्रहण’ आता सुटणार आहे. पुण्यातील प्रगत संगणक विकास केंद्राने (सीडॅक) खास ‘जीस्ट नेमस्कॅप’ हे सॉफ्टवेअर विकसीत केले असून यामुळे जे याद्यांमधील दुबार नावे एका क्लिकवर शोधून समोर ठेवणार आहे.
हे सॉफ्टवेअर देशातील 22 प्रादेशिक भाषांमध्येही तयार करण्यात आले असून भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले सॉफ्टवेअर ठरले आहे. मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीची नावे दोनदा आल्यामुळे यादी मोठया प्रमाणात फुगते. एकटया पुणे जिल्हयात सुमारे साडेबारा लाख दुबार नावे मतदार यादीत असल्याची शक्यता आहे. अशीच स्थिती रेशनकार्डमध्येही आहे. एकाच व्यक्तीच्या नावावर दोन रेशनकार्ड, चुकीच्या नावाने रेशनकार्ड हे प्रकारही सुरू आहेत. पासपोर्ट, पॅनकार्ड बनवणा:या संस्थांबरोबर बँकांनाही या त्रासाने ग्रासले आहे.
हा प्रश्न लक्षात घेऊन पुण्यातील सीडॅकच्या टिमने खास ‘जीस्ट नेमस्कॅप’ हे सॉफ्टवेअर एक वर्ष संशोधन करून विकसीत केले आहे. तीन वष्रे अगोदर यासाठी माहिती जमा करण्याचे काम सुरू होते. महत्वाचे म्हणजे मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये हे सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आ��े. प्रादेशिक भाषांमध्ये एकाच वाक्याचा उच्चार वेगवेगळया पध्दतीने केला जातो. यामुळे संगणकामध्येही ती माहिती चुकीची भरली जाते. यातूनच दुबार नावे निर्माण होत आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये एकाच नावाच्या वेगवेगळया उच्चारानुसारची शब्दे देण्यात आली आहेत. यामुळे दुबारता टाळणे शक्य आहे.
याबाबत सीडॅकच्या सहायक संचालक आणि जीस्ट विभागाचे प्रमुख महेश कुलकर्णी म्हणाले, याचा वापर पोलीस, मोबाइल सेवा देणा:या कंपन्या, बँक यांनाही करता येणार आहे. एप्रिल महिन्यात हे सॉफ्टवेअर आम्ही लॉन्च केले. बँकाही हे सॉफ्टवेअर वापरत आहेत. निवडणूक आयोग, आयकर विभागाशीही आमचे बोलणे सुरू असून त्यांनाही हे सॉफ्टवेअर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आधार योजनेत वापर
देशातील महत्वकांक्षी ‘आधार’ योजनेचे सॉफ्टवेअरही सीडॅकनेच विकसीत केले आहे. या योजनते ‘जीस्ट नेमस्कॅप’ या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या योजनेत दुबार नावांचे प्रकार खूपच कमी असेल. आधार योजनेत प्रादेशिक भाषांमधील हे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे.
-महेश कुलकर्णी, स.संचालक, सीडॅक
काय आहे ‘जीस्ट नेमस्कॅप’ सॉफ्टवेअर?
या सॉफ्टवेअरमध्ये नावांची यादी टाकल्यानंतर त्यातील एकाच प्रकारची, वेलांटी, उकार वेगवेगळे पण उच्चार एकच होणा:या नावांची, वेगवेगळे पत्ते असलेली एकच नावे या सर्वाची यादी वेगळी तयार करून दाखविली जाणार आहे. ही नावे वेगळी झाल्याने त्यांची तपासणी करून एकाच व्यक्तीची असलेली दुबार नावे काढून टाकणे सोपे जाणार आहे.