मराठी विश्वकोश खंड 3' महाजालावर
Sakal
January 09, 2012
(Content in Marathi)
स्त्री शिक्षण प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेला मराठी विश्वकोश खंड 3 जनतेसाठी उपलब्ध होणे, ही निश्चितच समाधानाची बाब असून माहिती तंत्रज्ञानसारख्या गतिमान साधनांच्या साह्याने हा विश्वकोश युवा पिढीने सर्वदूर पोहोचवावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी काल (बुधवार) केले.
सोमय्या कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेला मराठी विश्वकोश-3 इंटरनेटवर अर्पण करण्यात आला, या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष आणि गायिका डॉ. नेहा राजपाल, विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. किशोर कुलकर्णी; तसेच सीडॅकचे संचालक महेश कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
देशात माहिती तंत्रज्ञान विकसित होत असल्याने डिजिटल विश्वकोशास घराघरांत नक्कीच स्थान मिळेल, असा विश्वास डॉ. विजया वाड यांनी या वेळी व्यक्त केला. डिजिटल विश्वकोशाच्या तिसऱ्या आवृत्तीची निर्मिती महाराष्��्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग यांच्या साह्याने केली आहे.