मराठी विश्वकोशाचा तिसरा खंडही ऑनलाइन
Divyamarathi
January 09, 2012
(Content in Marathi)
‘आजची पिढी ही टेक्नोसॅव्ही म्हणून ओळखली जाते. एखादा शब्द अडला तर त्याचा अर्थ आणि पार्श्वभूमी विश्वकोशात पाहण्याची सवय या पिढीला नाही त्यामुळे मराठी विश्वकोशाचा तिसरा खंड त्याचप्रमाणे येणारे सर्व खंड संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. किमान या मार्गाने तरी ज्ञानमार्ग जपला जावा’ अशी भावना ज्येष्ठ लेखिका विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या तिस-या खंडाच्या प्रकाशनावेळी व्यक्त केली.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेला मराठी विश्वकोश जगभरातील मराठी लोकांना उपलब्ध व्हावा यासाठी विश्वकोश संकेतस्थळावर आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटवणा-या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाने के. जे. सोमय्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात मराठी विश्वकोशाची तिस-या ई-आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याआधीही दोन खंड मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. आजपर्यंत 16 देशांतील एक लाखांहून अधिक मराठी भाषिकांनी या संकेतस्थळाला भेट दिल्याचे डॉ. विजया वाड यांनी सांगितले.
या संकेतस्थळामुळे विश्वकोश कोशात न राहता विश्��ात यावा, अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख तसेच गायिका नेहा राजपाल यांच्यासह सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुधा व्यास, लीलाबेन कोटक, शिक्षणतज्ज्ञ अविनाश तांबे, दिनकर गांगल, समाजसेविका आशा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.