सुपरफास्ट सुपरकम्प्युटर

 
C-DAC Logo
 
Maharashtra Times
March 16, 2016

इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सी-डॅकने बनविला परम शावक

देशातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवनव्या संशोधनाला चालना आणि त्यांच्यातील कौशल्यगुण वाढविण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) या विद्यार्थ्यांसाठी परम शावक सुपरकम्प्युटर तयार केला असून तो देशातील बहुतांशी एनआयटी आणि प्रमुख कॉलेजमध्ये बसविण्यात येत आहे. देशातील सर्वच इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये ही सुविधा निर्माण होण्यासाठी सी-डॅकची अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) चर्चा सुरू आहे. येत्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातील इंजनिअरिंग कॉलेजमध्ये हा सुपरकम्प्युटर दिसण्याची शक्यता आहे.

देशातील इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्प करता येण्यासाठी सर्व्हर व त्याला जोडलेले संगणक असतात. मात्र, या सर्व्हरचा वेग आणि त्याच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा लक्षात घेता त्याद्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करताना व प्रकल्प बनवताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सी-डॅकने शावक हा लहान आकाराचा सुपरकम्प्युटर तयार केला आहे. देशात डिसेंबर २०१४मध्ये कोइम्बतुरच्या पी. एस. जी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हा पहिला सुपरकम्प्युटर बसविण्यात आला. त्यानंतर देशातील काही एनआयटी, ईशान्य भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयात व प्रमुख महाविद्यालयांमध्ये हे सुपरकम्प्युटर बसविल्याची माहिती, सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी सांगितले.

त्यासाठी सी-डॅकने लहान आकाराची सीपीयू मशिन तयार केली आहे. या मशिनद्वारे हा सुपरकम्प्युटर काम करेल. या सुपरकम्प्युटरचा वेग महाविद्यालयातील सर्व्हरच्या वेगापेक्षा शंभरपट अधिक आहे.

असा आहे परम शावक

परम शावक सुपरकम्प्युटर कॉलेजमध्ये कमीत कमी पायाभूत सुविधांमध्ये स्थापन केला जाऊ शकतो तसेच त्याची देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी आहे. या सुपरकम्प्युटरच्या कार्यक्षमतेचा वेग २ टेराफ्लॉप व त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजमधील सर्व्हरच्या तुलनेत या सुपरकम्प्युटरच्या कार्याचा वेग अधिक आहे. यामध्ये पॅरलल प्रोग्रॅमिंग, म्हणजे एकच प्रोग्रॅमिंग अधिक ठिकाणी करण्याची सुविधा आहे. यात विज्ञान आणि इंजिनीअरिंग विषयाशी संबंधित अप्लिकेशन, टुल्स आणि ग्रंथालय आहेत. सी-डॅकने विकसित केलेले सॉफ्टवेअर असतील. तसेच उपयोगी सुपरकम्प्युटरच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी माहितीची गरज भासल्यास सी-डॅक पुणे केंद्रातील परम युवा - दोन या सुपरकम्प्युटरमार्फत मिळवण्याची मुभा असेल.

अभियांत्रिकीचे प्रकल्प तयार करुन त्यांचा फायदा लोकोपयोगासाठी करण्याबाबत मदत होईत. या सुपरकम्प्युटरचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना होण्यासाठी एआयसीटीई आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांसारख्या (सीओईपी) शिक्षण संस्थांशी चर्चा सुरु आहे.

- प्रा. रजत मूना,
महासंचालक, सी-डॅक

Top