मराठीतूनच करा ‘सर्फिंग’

 
C-DAC Logo
 
महाराष्ट्र टाइम्स
अप्रैल 09, 2016

नागरिकांना सरकारी कामे, सोशल मीडिया साइट्वरील सर्फिंग, पैशांचे व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग, विविध प्रकारच्या वेबसाइट्सवरील ऑनलाइन कामे आता मराठीतूनच करता येणार आहेत. मराठीसह देशात प्रादेशिक भाषांचे अस्तित्व टिकवण्यासाठी 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग'ने (सी-डॅक) पुढाकार घेतला आहे.

'सी-डॅक'च्या मराठी भाषा उत्कृष्टता केंद्राने (सीओई) देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तेथील भाषांसाठी स्वतंत्रपणे भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाकडे तो प्रस्ताव पाठविला आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने सी-डॅकच्या सीओई केंद्राची स्थापना सुमारे चार वर्षांपू्र्वी झाली.

या केंद्राच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी भाषा वापरण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात. त्याची सुरुवात राज्यातील शासकीय संकेतस्थळांचे मराठीत रुपांतर, मराठी विश्वकोश व कुमार विश्वकोश यांचे डिजिटायजेशन, मराठीत फाँट, टुल्स, सॉफ्टवेरची निर्मिती आदी यशस्वी प्रयोग राबवून केली आहे. मात्र, हा प्रयोग केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित न ठेवता तो इतर भाषांमध्ये राबवण्याचा प्रस्ताव 'सी-डॅक'च्या सीओई केंद्राने तयार केला.

सरकारच्या मान्यतेनंतर देशातील प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासीत प्रदे���ात तेथील प्रादेशिक भाषेत भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र उभे राहणार आहे. यामुळे संबंधित राज्यांच्या वेबसाइट प्रादेशिक भाषेत रुपांतरीत होतील. तेथे संबंधित प्रादेशिक भाषेत व्यवहाराची आणि लिहिण्याची सुविधा असेल. त्यामुळे त्या राज्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या संकेतस्थळांवरील ऑनलाइन कामे कम्प्युटर आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून स्थानिक भाषेत करता येतील.

राज्यात स्थापन होणाऱ्या या केंद्राद्वारे प्रादेशिक भाषेचा वापर वाढविण्यासाठी त्या भाषेत टुल्स, सॉफ्टनेअर आणि फाँट विकसित करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञानात या भाषेचा वापर वाढविण्यासाठी राज्यातील विद्यापीठ, माहिती तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, साहित्य क्षेत्राशी निगडीत संस्थांची मदत घेतली जाईल. पुण्यातील सी-डॅक येथील मुख्य केंद्रातून इतर राज्यातील केंद्रांना मार्गदर्शन करण्यात येईल.

एकोणीस भाषांचा अंतर्भाव

या केंद्रांद्वारे मराठी, हिंदी, कोकणी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमि‍ळ, ऊर्दु, सिंधी, पंजाबी, संस्कृत, ओडिया, काश्मिरी, मणिपुरी, मल्याळम आदी भाषा माहिती तंत्रज्ञानात आणि संगणकाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

माहिती तंत्रज्ञानात प्रादेशिक भाषांचा वापर वाढविण्यासाठी टुल्स, फाँट यांसारख्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता केली जात आहे. मात्र, आता त्या प्रादेशिक भाषांमध्ये विविध साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. नागरिकांनी देखील त्यांची ऑनलाइन कामे स्थानिक भाषांमध्ये करण्यासाठी इनस्क्रीप्ट आणि युनिकोडचा वापर केला पाहिजे.

महेश कुलकर्णी, सहसंचालक, सी-डॅक

Top