अॅपमधून होणार म्युझियमची सैर

 
C-DAC Logo
 

अॅपमधून होणार म्युझियमची सैर

Maharashtra Times
October 27, 2014

(Content in Marathi)

एखाद्या म्युझियममधून तुम्ही फिरत आहात, समोर एखादी ऐतिहासिक वस्तू आहे आणि त्याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळत चालली आहे. तुमच्या आजूबाजूच्या वस्तू बदलल्या, की मोबाइलवरची माहितीही आपोआपच बदलणार आहे. गरज असेल, ती केवळ एका 'अॅप'ची !

Digitising Museumही केवळ कल्पना नाही. 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग'च्या (सी-डॅक) 'व्हर्ज्युअल म्युझियम'च्या प्रकल्पाच्या माध्यमातून ही बाब लवकरच सत्यात अवतरणार आहे आणि केवळ ऐतिहासिक बाब म्हणून अशा म्युझियमकडे बघणाऱ्यांच्या नजरांना आपोआपच आधुनिकतेची एक आगळी-वेगळी दृष्टीही लाभणार आहे. देशभरातील दहा निवडक म्युझियममधील सर्व माहितीच्या खजिन्याचे ई- पोर्टल असणाऱ्या www.museumsofindia.gov.in या 'सी-डॅक'च्या उपक्रमाचे नुकतेच दिल्लीमध्ये औपचारिक उद्घाटन झाले. यानिमित्ताने या पोर्टलच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुण्यातील 'सी-डॅक'च्या ह्युमन सेंटर्ड डिझाइन अँड कम्प्युटिंग ग्रुपचे प्रमुख आणि संस्थेचे सहयोगी संचालक डॉ. दिनेश कात्रे यांनी या प्रकल्पातील बारकाव्यांची 'मटा'ला माहिती दिली.

केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मदतीने हा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे. देशभरातील दहा वेगवेगळ्या म्युझियममधील जवळपास पाच लाखांवर ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंची माहिती त्यात एकत्र केली जात आहे. त��यासाठीचे काम सुरू झाले असून, प्रत्येक म्युझियममधील जवळपास एक हजारांवर वस्तूंची माहिती आता या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांसाठी खुली करण्यात आल्याचे डॉ. कात्रे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी सर्व म्युझियमच्या क्युरेटर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातूनच हा प्रकल्प पुढे नेला जात आहे.

प्रकल्पाच्या या पुढील टप्प्यात उपक्रमाच्या मोबाइल अॅपची निर्मिती केली जात आहे. तसेच, शिक्षकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेत, त्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना रंजकपणे इतिहास शिकवू शकणाऱ्या ई- लर्निंग अभ्याससाहित्यांची निर्मिती करण्याचा प्रयत्नही संस्था या प्रकल्पातून करणार असल्याचे डॉ. कात्रे यांनी सांगितले.

अभ्यासकांसाठी महत्त्वाच्या बाबी

एकाच ठिकाणी बसून, देशभरातील सर्व म्युझिअममध्ये एकाच विशिष्ट विषयाशी संबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचा आढावा घेणे शक्य.

एखाद्या अभ्यासकाला अशा विशिष्ट विषयावर शोधनिबंध लिहिण्याची सोयही पोर्टलवरील व्हर्च्युअल गॅलरीच्या माध्यमातून उपलब्ध.

एखाद्या विषयाचा कालानुक्रमे अभ्यास करण्यासाठी 'टाइमलाइन'च्या माध्यमातून सुविधा उपलब्ध.

देशभरातील सर्व महत्त्वाच्या म्युझियममधील भिंती एका व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दूर.

Top