परम संगणकाचा अनेक देशांना आधार
Daily Divya Marathi
November 23, 2011
(Content in Marathi)
एकेकाळी भारतास सुपर कॉम्प्युटर नाकारणार्या अमेरिकेच्या वर्चस्वाला हादरा देत देशाने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अल्पावधीत परम संगणक बनवला. सध्या हा संगणक विविध देशांच्या कारभारात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती सी-डॅकच्या एच.पी.सी.एस.ग्रुपचे प्रमुख गोल्डी मिर्शा व प्रकल्प अधिकारी प्रसाद वडलकोंडावार यांनी दिली.
भारताने आंतरराष्ट्रीय करारांतर्गत सिंगापूर, रशिया, घाना, टांझानिया, अर्मेनिया या देशांना परम संगणक दिला असून व्हिएतनाम, कझाकस्तान, ग्रेनडा, बेलारुस, घाना (फेज दोन) या देशांशी तंत्रज्ञान हस्तांतर करार प्रगतिपथावर आहे. नेपाळच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच एच.पी.सी.एस.च्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
परम संगणक प्रशिक्षण व तंत्रज्ञानाचे हस्तांतर विविध देशांबरोबर दोन विभागात होत असून पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण गोष्टींची पूर्तता तर दुसर्या टप्प्यात विशिष्ट सुधारित तंत्रज्ञान हस्तांतर केले जात आहे. वेगवेगळ्या देशांच्या गरजांप्रमाणे तंत्रज्ञानाचे, प्रशिक्षणाचे, संशोधनाचे कालावधी ठरवले जातात. परस्पर देशांत शास्त्रज्ञ पाठवणे, उभयतांमधील सांमजस्य करारातून जगात भारताचे हितचिंतक तयार करणे तसेच विक���नशील राष्ट्रांना मदत करणे हे धोरण आहे.
परम संगणकाचा उपयोग माहिती-तंत्रज्ञान, हवामान बदल, शेती, आर्थिक संशोधन, आरोग्य, आपत्कालीन व्यवस्थापन, मॉलिक्युलर मोड्युलिंग, भूगर्भशास्त्र, सांख्यिकी, विज्ञानातील मूलभूत घडामोडी याकरिता फायदेशीर ठरते.
या संगणकाद्वारे दुचाकी-चारचाकी गाड्या-विमान यांचे डिझाइन, औषधांचे संशोधन व वर्गीकरण, हवामान बदलातील फरकांची नोंद, बायोइन्फरमॅटिक्स, कॉम्प्युटिशनल रसायनशास्त्र, सांख्यिकी या कामात वापर मोठय़ा प्रमाणात होतो आहे.